
वांद्रे येथे घरफोडी करण्यासाठी आलेल्या चौघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. अब्दुल्ला उस्मान सय्यद ऊर्फ छोटा अब्दुल्ला, नूर बादशहा अजगरअली शेख, विजय हेमाजी चव्हाण ऊर्फ विज्या आणि युसूफ ऊर्फ नूर गुलाम कादर अशी त्या चौघांची नावे आहेत. अब्दुल्ला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत 17 गुन्हे दाखल आहेत.
वांद्रय़ाच्या रिबेल रॉडच्या सेंट रॉक रोड येथील बंद घरात घरफोडी करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. परिमंडळ-9 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सागर निकम, सहाय्यक निरीक्षक नडविनकेरी आदींच्या पथकाने तेथे सापळा रचला. सोमवारी रात्री तीन जण टॅक्सीने आणि दोन जण मोटारसायकलवरून तेथे आले होते. पोलिसांना पाहताच ते पाच जण पळू लागले. अखेर पोलिसांनी पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले, तर मोटारसायकलवरून आलेला एक जण पळून गेला आहे.































































