‘गरिबांच्या फ्रिज’लाही महागाईचा फटका, माठाच्या किमतीत 50 ते 70 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून ओळख असणाऱया मातीचे माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे माठही महागले असून, विक्रीच्या किमतीत 50 ते 70 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्यांना उन्हाच्या तडाख्यासोबतच वाढलेल्या महागाईच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला थंडावा देण्यासाठी व तहान भागवण्यासाठी नागरिक सर्रास मातीचे माठ वापरतात. पाणीही गोड, चवदार लागते शिवाय शरीरालाही काही अपाय नाही. दरम्यान, कच्चा मालात झालेली वाढ, वाढती मजुरी यामुळे माठाच्या किमतीत दरवर्षीच मोठी वाढ झाली आहे. मात्र, सध्या वाढत्या महागाईचा फटका बसल्याने चालू वर्षी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत किमती वाढल्या आहेत. जिह्यात व शहरात बिहार राज्यातील विक्रेते मोठय़ा प्रमाणावर असून, त्यांनी वर्षानुवर्षे विक्रीत चांगला जम बसवला आहे. त्याचबरोबर स्थानिकांनीही या व्यवसायात उडी घेतलेली दिसून येत आहे. काळे माठ आपल्या राज्यासह राजस्थानातून, तर लाल रंगाचे आकर्षक नक्षीकाम केलेले माठ दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थानातून मागवले जातात.

वाहतुकीदरम्यान चालक चांगला असल्यास तूटफूट कमी प्रमाणात होते; अन्यथा 1000 माठांमागे 150 ते 200 मठ फुटतात. त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागतो, असे एका परराज्यातील विक्रेत्याने सांगितले. त्यातच विक्रीसाठी लावलेल्या दुकानाची जागा महापालिकेची असल्यास त्याची दररोज पावती फाडावी लागते, तर ही जागा खासगी असल्यास त्याचे भाडे द्यावे लागते. त्याचाही परिणाम विक्री किमतीवर होतो. नळ नसलेले माठ 50 त 60 रुपयांनी महागले असून, माठाच्या आकारानुसार 150 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत माठांच्या किमती आहेत.

आकर्षक नक्षीकाम अन् रंगसंगती

‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून ओळख असलेल्या माठाला आता आपल्या नवनव्या रुपामुळे सधन कुटुंबातही पसंती दिली जात आहे. ग्राहकही या नवनव्या रुपातील माठांनाच मोठी पसंती देत आहेत. पारंपरिक असलेल्या काळ्या माठांऐवजी आधुनिक रंगीबिरंगी विविध आकारांतील माठ आता बाजारात मिळत आहेत. माठाला नळ, आधुनिक आकार, त्यावर सुंदर नक्षीकाम असेही माठ आजकाल बाजारात मिळत आहेत. काही घरांमध्ये फर्निचर व स्वयंपाक खोलीच्या रचनेनुसार माठ ठेवले जातात.

आपण नगर येथे गेल्या 18 वर्षांपासून कुटुंबीयांसह माठविक्रीचा व्यवसाय करीत असून, यावर्षी इंधन दरवाढीमुळे वाहतूकखर्चात वाढ झाली आहे. शिवाय कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्यामुळे माठ महागले आहेत. तरीही नागरिक माठखरेदीला पसंती देत आहेत.
– संतोष, माठविक्रेता.