
मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक 2022 साठी मतदार यादी ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे; मात्र या यादीतून शेकडो मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे गायब असल्याचा दावा मुंबई युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (मुक्ता) या संघटनेने केला आहे. विद्यापीठाने एकूण 3087 शिक्षकांची मतदार यादी जाहीर केली. मात्र यातील 597 शिक्षकांची नावे बाद करण्यात आली आहेत. या शिक्षकांनी पदमान्यतेसंदर्भात कागदपत्रे जोडली नसल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे; मात्र शिक्षकांनी सर्व कागदपत्रे जोडूनही शिक्षकांना जाणूनबुजून मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप ‘मुक्ता’ संघटनेने केला आहे.
मुंबई विद्यापीठाने यंदा ऑनलाइन प्रणाली वापरून मतदार यादीसाठी कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यास सांगितले. ज्या शिक्षकांची नावे मतदार यादीतून बाद केली आहेत अशा सर्व शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड केली होती. तरीदेखील त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले असून याप्रकरणी ‘मुक्ता’ संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुभाष आठवले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मतदार यादी तयार करण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेवर अनेकदा आक्षेप घेतला. यात चुका आहेत. शिक्षकांनी सर्व कागदपत्रे अपलोड करूनदेखील मतदार यादीतून शिक्षकांना बाद करण्यात आले. बहुसंख्य चुका या शिक्षकांच्या मान्यतेविषयी आहेत. विद्यापीठाकडे मान्यतेबाबत प्रत्येक शिक्षकाच्या नोंदी आहेत. विद्यापीठाने या नोंदी तपासून शिक्षकांना मतदानाचा हक्क द्यावा. – सुभाष आठवले, जनरल सेक्रेटरी, मुक्ता
मतदार यादीतील शिक्षकांची संख्या कमी
मुंबई विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त तब्बल 10 हजार 477 शिक्षकांना सिनेट निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असेही सुभाष आठवले यांनी सांगितले. विद्यापीठाने निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी वेळीच महाविद्यालये, प्राचार्यांना सूचना दिल्या असत्या तर यंदा शिक्षक मतदारांची संख्या वाढली असती, असा दावाही आठवले यांनी केला आहे.
– विद्यापीठ शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तपासून शिक्षकांच्या पदांना मान्यता देते.
– विद्यापीठाकडून शिक्षकांच्या पदाला मान्यता मिळाल्यानंतरच त्या शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळतो.
























































