मुलायमसिंह यादव हेच वंचितांचे खरे नेते; मायावतींची स्तुतिसुमने

सामना ऑनलाईन । मैनपुरी

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये सपा, बसपा आणि रालोदच्या संयुक्त सभेत बसपा अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. मुलायमसिंह यांनी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचे काम केले आहे. मुलायम हेच वंचितांचे खरे नेते आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे मुलायमसिंह नकली नेते नाहीत. वंचितांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कार्य करणारे ते खरे नेते आहेत, असेही मायावती यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेस्ट हाऊस प्रकरणाचा उल्लेख करत या दुर्दैवी घटनेच्या कटू आठवणी अजूनही आपल्या मनात आहेत. मात्र, जनतेसाठी आणि अयोग्य लोकांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. या सभेच्या निमित्ताने मायावती आणि मुलायमसिंह 24 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

मायावती आमच्या मतदारसंघात प्रचारासाठी आल्या आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी केलेली ही मदत विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मायावती यांनी नेहमी समाजवादी पक्षाला मदत केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन त्यांनी केले. ही आपली शेवटची निवडणूक आहे. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे जनतेने मताधिक्याने निवडून द्यावे. हा विजय सर्वात मोठा विजय असला पाहिजे, असेही ते म्हणाले. ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. भाजपने नोटाबंदी आणि जीएसटी आणून व्यापार आणि उद्योगधंदे अडचणीत आणले आहेत. त्यामुळे देशाला आता नव्या पंतप्रधानाची गरज आहे. देशाने नवा पंतप्रधान निवडण्यासाठी पुढाकार घ्यावा असे अखिलेश यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुलायमसिंह यांची ही पहिलीच सभा आहे. या संयुक्त सभेला रालोदचे प्रमुख अजित सिंह अनुपस्थित होते. मैनपुरी मतदारसंघात भाजपला आतापर्यंत विजय मिळवता आलेला नाही. 1996 मध्ये मुलायमसिंह या मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर ते या मतादारसंघातून निवडून येत आहेत.