मुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलाचा भाडेपट्टी करार वाढवा! शिवसेनेची मागणी

523

मुंबई महानगरपालिका ‘बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठान’ यांचे मुलुंड येथे असलेले ‘प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल’ व अंधेरी येथील ‘शहाजी राजे क्रीडा संकुल’ यांची भाडेपट्टी कराराची मुदत वाढवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. ‘बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठान कर्मचारी सेना’ यांच्या वतीने अध्यक्ष संजय मशिलकर व सचिव सुनील कदम यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन भाडेपट्टी करार वाढवण्याची निवेदनाद्वारे त्यांच्याकडे विनंती केली आहे.

या वर्षी दोन्ही संकुलांचा भाडेपट्टी करार संपत आहे. असे झाल्यास दोन्ही संकुलांतील 125 कर्मचारी व अधिकारी कामाविना बेघर होतील. यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, दोन्ही संकुलांचा भाडेपट्टी करार वाढवण्याचे काम याआधीच सुरू केले आहे. हा करार नक्कीच वाढवून घेतला जाईल. तसेच शिवसेना कोणालाही वाऱयावर सोडणार नाही, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त आदेश बांदेकर, संकुल अधिकारी विनायक गोडांबे, पेडणेकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सरचिटणीस अमोल कीर्तिकर, सदस्य सुभाष चव्हाण, उमेश कोळवणकर, गजानन पाताडे व देवीदास ढवळे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या