
‘आरे’ कॉलनीमध्ये सिमेंट-काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही तडे गेल्याबाबतची बातमी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेची पालिका प्रशासनाने दखल घेत संबंधित कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे नागरिक, वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त करण्याचे ‘गाजर’ दाखवत पालिकेच्या माध्यमातून सर्व रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचे धोरण राबवण्याचा निर्णय मिंधे सरकारकडून घेण्यात आला. यामध्ये कोणतेही नियोजन न करता एकाच वेळी 400 किमी रस्त्यांच्या कामांसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र ‘मिंधे’ सरकारची ही ‘गतिमानता’ चांगलीच अंगलट येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी कामे सुरूच झाली नाहीत, तर कामे सुरू झालेल्या ठिकाणी कामांचा दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये ‘आरे’ कॉलनी येथे काम अपूर्ण असतानाच सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याला तडे पडल्याने यावर शिक्कामोर्तब झाले. पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम सुरू असलेल्या रस्त्याची दुरवस्था होत असल्याने रहिवासी, वाहनचालक, प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. यानुसार या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचे शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी सांगितले.
पालिका म्हणते…
‘आरे’तील रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याला तडे जात असल्याबाबतच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. तडे गेलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले असून काम सुरूदेखील झाले आहे.
अशी आहे रस्त्याची दुरवस्था
‘आरे’ चेक नाका ते मरोळ चेक नाका असा एकूण 7.5 किमीचा रस्ता आहे. दीड वर्षापूर्वी काम सुरू झालेल्या रस्त्याचे सद्यस्थितीत केवळ तीन किमीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ‘आरे’ चेक नाका युनिट नंबर 16, युनिट नंबर-3 यादरम्यान रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. हा रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेगाने लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे.
























































