एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱया कोकणातील नौकांवर कोस्ट गार्डची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

कोकण किनारपट्टीवर मासेमारी नौकांवर प्रखर एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱया नौकांच्या विरोधात महाराष्ट्राच्या मत्स्य विभागाने कोस्ट गार्डच्या बोटींच्या मदतीने (तटरक्षक दल) कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशांमुळे कोकण किनारपट्टीवर एलईडी दिव्यांच्या मासेमारीवर पूर्णपणे बंदी येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पुढाकारामुळे एलईडी दिव्यांच्या नौकांवर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मासेमारी नौकांवर एलईडी दिवे लावून मासेमारी करण्यास बंदी आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे पारंपारिक मच्छिमारांवर आर्थिक संकट कोसळले होते. या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवा सेना राज्य कोअर समितीचे सदस्य योगेश कदम, शिवसेना खासदार राजकुमार धूत, आमदार अशोक पाटील यांच्यासह बारा जणांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन व केंद्रीय मत्स्यविभागाच्या सचिवांची स्वतंत्रपणे भेट घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मत्स्यविभागाच्या सचिवांना फोन करून एलईडी दिवे लावून मासेमारी करणा-या नौकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला व कारवाईचे आदेश दिले.

एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱया नौकांवर कोस्ट गार्ड व मत्स्यव्यवसाय विभागाने कोस्ट गार्डच्या बोटींच्या मदतीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. राज्याच्या मत्स्यविभागाचे सचिव अनुप कुमार यांनाही फोन करून कारवाईचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 11 एप्रिलला मत्स्य विभागाचे सचिव रत्नागिरीला जाऊन या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठका घेणार आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, एलईडी दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली. या मागणीला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर यासंदर्भात कायदा केला जाणार आहे.

शिवसेनेचा पुढाकार

संपूर्ण कोकण किनारपट्टीवर एलईडी पर्ससिननेटद्वारे करण्यात येणाऱया मासेमारीमुळे येथील पारंपरिक मासेमारी करण्यावर आर्थिक संकट कोसळले होते. त्यामुळे कोकण किनारपट्टीतील स्थानिक पारंपरिक मासेमारांनी संघर्ष सुरू केला होता. या संघर्षाचा एक भाग म्हणून मासेमारांनी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत युवासेना राज्य कोअर कमेटी सदस्य योगेश कदम यांनी दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याला बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितच तुमचे प्रश्न मार्गी लावू असे वचन दिले होते.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. एन. चोगले, विष्णू तबीब, कलंदर शेखनाग, गोपिंचद चोगले, महेंद्र चोगले, अस्लम खान हे मच्छीमार संघर्ष समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.