एनसीबीची आग्रीपाडय़ात धडक कारवाई, ‘एमडी’चा मोठा साठा जप्त

नाकाेटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने शनिवारी रात्री आग्रीपाडा येथे कारवाई करून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. लॉकडाऊन काळात डबल भावात ड्रग्ज विकणाऱया सर्फराज कुरेशी ऊर्फ पप्पीच्या एनसीबीने मुसक्या आवळल्या. सर्फराजच्या चौकशीनंतर एनसीबीने नागपाडय़ात समीर सुलेमानच्या घरी कारवाई करून त्याच्या घरातून 17 लाख 90 हजार रुपये जप्त केले.

एनसीबीने गेल्या काही दिवसांत दक्षिण मुंबईत कारवाई करून ड्रग्ज पेडलरचे कंबरडे मोडले आहे. आग्रीपाडा येथे जण एक ड्रग्ज विकत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पथक आग्रीपाडा येथे गेले. आग्रीपाडा पोलीस आणि एनसीबीचे पथक सर्फराजच्या घरात घुसले. तेव्हा सर्फराजच्या घरातील सदस्यांनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा घेऊन सर्फराज हा बाथरूममध्ये पळून गेला. त्याने बाथरूमबाहेरील खिडकीत ड्रग्जचा साठा लपवून ठेवला. अखेर तो ड्रग्जचा साठा आणि घरात ठेवलेले सवादोन लाख रुपये एनसीबीने जप्त केले.

एनसीबीने चिंकू पठाण आणि चिकनाला गजाआड केल्यावर सर्फराज हा एकटाच ड्रग्ज विकत होता. लॉकडाऊन काळात तो डबल भावात ड्रग्ज विकायचा. त्याच्याकडे ड्रग्ज घेण्यासाठी रोज अनेक जण येत असायचे. कोविडचे रुग्ण वाढत असतानाच सर्फराजकडे ड्रग्जसाठी नशेबाज ये-जा करत असल्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले होते. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने सर्फराजची चौकशी केली. त्याच्या चौकशीत समीर सुलेमानचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीचे पथक कारवाईसाठी नागपाडा येथे गेले. तेव्हा समीर हा घरी नव्हता. त्याच्या घरातून एनसीबीने 54 ग्रॅम एमडी आणि 17 लाख 90 हजार रुपये जप्त केले.

बदलापुरातून 43 किलो गांजा जप्त

एनसीबी मुंबई युनिटने बदलापूर येथे कारवाई करून 43 किलो गांजा जप्त केला. गांजाची तस्करी करणाऱया सनी परदेशी आणि अजय नायरला एनसीबीने ताब्यात घेतले. सनी तो गांजा कुणाल कडूकडून घेत होता. तो गांजा ओडिशा येथून बदलापूरला येत असायचा. त्यानंतर सनी आणि अजय हे गांजा विकायचे. ओडिशा येथून गांजा बदलापूरला पाठवणाऱयाचा एनसीबी शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या