
सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मानधनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देण्यात येईल, अशी घोषणा महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पंकजा मुंडे यांची भेट घेतली. बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. नोकरीत मिळालेले मानधन कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाहीत. परिणामी निवृत्तीनंतर औषधोपचार तसेच उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी निवृत्तीवेतन आवश्यक आहे, असे मुंडे म्हणाल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधनवाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या.
























































