मुंबईत 15 जुलैपासून अँटीबॉडीज तपासणार, पाचवा ‘सेरो’ सर्व्हेक्षण सर्व वयोगटासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 15 जुलैपासून सर्व वयोगटासाठी सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईत होणाऱया या पाचव्या सेरो सर्वेक्षणामुळे अँटीबॉडीज तपासल्या जाणार असून कोरोनाविरोधात निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीचा अंदाज बांधता येणार आहे. त्यामुळे पालिकेला कोरोना लढय़ात निर्णय घेण्यासही मोठी मदत होणार आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण होणाऱया प्रतिपिंडांची-प्रतिकारशक्तीची चाचणी करण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. झपाटय़ाने लागण होणाऱया कोरोना विषाणूच्या प्रभावात अनेक जणांना कोरोना होऊन गेल्याचे तर काहीजण कोरोनाबाधितांच्या संपका&त आल्यामुळे अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले.

पहिल्या टप्प्यात पालिका आणि काही संस्थांनी केलेल्या सेरो सर्वेक्षणात घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये झोपडपट्टीत 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागात 16 टक्के अँटीबॉडीजचे प्रमाण आढळून आले होते. झोपडपट्टी भागातील रहिवाशांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्याचे समोर आले. आर-उत्तर, एम-पश्चिम आणि एफ-उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी अँटीबॉडीची पडताळणी करण्यात आली.

सर्व्हेच्या दुसऱया टप्प्यात ‘आयसीएमआर’च्या सूचनेनुसार मुंबईमधील एफ-उत्तर (माटुंगा), एम-पश्चिम (चेंबूर) आणि आर-उत्तर (दहिसर) विभाग कार्यालयांच्या हद्दीत सेरो सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 5,840 जणांची तपासणी करण्यात आली. झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या.

तिसऱया टप्प्यातील सर्वेक्षणात 10 हजार

197 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 36.30 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडिज आढळल्या.

…म्हणूनच घेतला निर्णय

सेरो सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 15 जून 2021 या कालावधीत सर्व वॉर्डमध्ये मुलांमध्ये सेरो सर्वेक्षण केले. संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ञांनी व्यक्त केला असताना सेरो सर्वेक्षणात 50 टक्क्यांहून जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष दिलासा देणारा ठरल्यामुळे पाचवा सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.