
तरुणीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी रिक्षाचालकाला वनराई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोन दिवसांपूर्वी राम मंदिर स्थानक परिरात तरुणी रडत असल्याची माहिती एकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काही वेळातच वनराई पोलीस घटनास्थळी आले. त्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्या शरीरातून ब्लेड आणि दगडाचे तुकडे काढले होते. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. तिने सुरुवातीला ती तिच्या काकासोबत उत्तर प्रदेश येथून मुंबईत आल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तिच्या जबाबाची शहनिशा केली. तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली. तिचे वडील रागीट स्वभावाचे असल्याने ती नैराश्यातून घर सोडून निघून आली होती. नालासोपारा येथे एका रिक्षाचालकाने तिची विचारपूस केल्यानंतर त्याने तिला अर्नाळा परिसरात नेले. तेथे नेऊन त्याने तिच्यासोबत नकोसे कृत्य केले.
त्या घटनेने ती घाबरली. त्यातच दिवसभर घरी नसल्याने कुटुंबीय ओरडतील या भीतीने तिने खोटी साक्ष दिली. पोलिसांनी पुन्हा तिला विश्वासात घेतले. त्यानंतर पोलीस नालासोपारा परिसरात गेले. वनराई पोलिसांनी वालिव परिसरातून रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलिसांच्या स्वाधीन केले.