प्रवाशांची फसवणूक करणारी चौकडी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑटो रिक्षाच्या मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या मदतीने फेरफार करून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने पकडले. इलेक्ट्रॉनिक सर्किटने मीटर फास्ट करून हे भामटे प्रवाशांकडून अवाच्या सवा पैसे उकळत होते. अखेर त्यांची ही चालबाजी उघडकीस आले आणि चौघेही गजाआड गेले.

बोरिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात काही रिक्षाचालक मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लुटमार करीत असल्याची खबर कॉन्स्टेबल राजेंद्र पेडणेकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशा कोरके व पथकाने बोरिवली पूर्वकडील रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पथकाने दोघा रिक्षाचालकांना ताब्यात घेतले. त्यांना कक्ष कार्यालयात आणून परिवहन विभागाच्या अधिकाऱयांसमोर त्यांच्या रिक्षाची पाहणी केली. त्यावेळी त्या चालकांनी रिक्षातील फेअर मीटरच्या वायरला ड्रायव्हर सीटच्या खाली इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडलेले आढळले. तसेच ते स्पीडो मीटर रीडिंग फेअर प्राइस बोगस बटणमुळे वाढताना आढळून आले. चालकांचा हा झोल उघडकीस येताच पोलिसांनी संजय शेरकर (22), अमिन रमझान पठाण (23), मोहम्मद बिलाल फकीर मोहम्मद मन्सूर (45) आणि प्रदीप शिर्के या चौघांना अटक करून त्यांच्या रिक्षादेखील जप्त करण्यात आल्या.