
मुंबई सहकारी बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱया दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज हल्लाबोल केला.
विधिमंडळाच्या आवारात नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारले.
मुंबई बँकेची लूट
मुंबई बँकेची लूट करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते ‘तेव्हा करेल तो भरेल’ असे म्हणणारे भाजपचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत असल्याचे नाना पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यपाल नव्हे, ‘भाजप’पाल
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली. या निवडणुकीबाबत राज्यपालांना पुन्हा कळविण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.
राज्यपालांकडून प्रतिसाद नाही
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून त्यासंदर्भात कळवले आहे; परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. आघाडीतील तिन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे, एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की नावही जाहीर करू, असे नाना पटोले यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

























































