
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये आता मोबाईल वापरावर मर्यादा येणार आहेत. कारण यापुढे तुमच्याकडे इयरफोन नसतील तर तुम्हाला मोबाईलवर जोरजोरात गाणी वाजवता तसेच बोलता येणार नाही. या नियमाचे पालन न केल्यास तुमच्यावर थेट पोलीस कारवाई होऊ शकते. बेस्टने याबाबत एक पत्रक जरी केले आहे.
या पत्रकात लिहिल्याप्रमाणे, बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात व त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ तसेच व्हिडीओ ऐकत व बघत असतात. आवाजाची पातळी उच्च असल्यामुळे बसगाडीमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो. बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असून बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होवू नये, याकरीता मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम 38 / 112) सदर प्रवाशावर कारवाई होवू शकते. ही बाब विचारात घेऊन उपरोक्त संदर्भित प्रस्तावानुसार बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये ‘इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ व व्हीडीओ ऐकण्यास व बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत आहे.



























































