मुंबईत ‘भारतरत्न लता मंगेशकर’ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणार

लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परिसरात तीन एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. देशातील एकमेव अशा या महाविद्यालयात लतादीदींच्या सर्व अजरामर गाण्यांचे संग्रहालय असणार आहे. या महाविद्यालयाचे नाव ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ असे राहील, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

सामंत म्हणाले, ‘दीड वर्षापूर्वी लतादीदींच्या भेटीत त्यांनी वडिलांच्या नावे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार लतादीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने संगीत महाविद्यालय कसे असावे, याबाबतचा अहवाल सरकारकडे सादर केला होता. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय’ असे नाव देण्याचे यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने या महाविद्यालयासाठी वेळेत जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे लतादींदीच्या हयातीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. लतादीदींच्या निधनानंतर कुटुंबीयांशी चर्चा केली असता, त्यांनी लतादींदीच्या नावाने संगीत महाविद्यालय सुरू करण्यास होकार कळविला. त्यामुळे हे महाविद्यालय आता ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ या नावाने ओळखले जाईल. कालिना कॅम्पससमोर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत हे महाविद्यालय उभारण्यात येईल,’ असे सामंत यांनी स्पष्ट केले.

मंगेशकर कुटुंबियांच्या परवानगीशिवाय दीदींच्या नावे उपक्रम नको

राज्य सरकारने याआधीच ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यापीठात मंगेशकर कुटुंबियांच्या परवानगीशिवाय दीदींच्या नावे उपक्रम नको असे मत संबंधित संगीत महाविद्यालय समितीचे समन्वयक मयूरेश पै यांनी व्यक्त केले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचे काय झाले? युवासेनेचा विद्यापीठाला सवाल

मुंबई विद्यापीठाने लतादीदी हयात असतानाच मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्याल पूर्णत्वास नेले असते तर याचा सर्वाधिक आनंद ‘भारतरत्न’ गानकोकिळा लता मंगेशकर यांना झाला असता. पण विद्यापीठाने नियमांचा अडसर दाखवत हा प्रस्ताव पूर्णत्वास नेला नाही, असा आरोप युवासेनेने केला आहे. राज्य सरकारच्या वतीने विद्यापीठाला मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारले जावे ही मंगेशकर कुटुंबीयांचीही इच्छा होती, पण विद्यापीठाने राज्य सरकारच्या प्रस्तावाला नियमांचा अडसर दाखवला. राज्यपालांनीही या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास सांगितल्याचे कारण देत विद्यापीठाने अद्याप संगीत महाविद्यालय उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.