
मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण असायला हवे. जर महापालिकेचे अधिकार अबाधित राहून असे प्राधिकरण होणार असेल तर आमचा विरोध नाही अशी भूमिका भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना मांडली.
500 चौरस मीटरपेक्षा छोटय़ा भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणारे धोरण मुंबई महापालिकेने मंजूर केले. त्यातून काही सवलती देण्यात आल्या ही बाब अत्यंत चांगली आहे. पण एकदा धोरण महापालिकेच्या सुधार समितीने मंजूर केल्यानंतर पुनर्विकासाचे प्रत्येक प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीत आणायची अट का घातली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सी लिंक नुकसानभरपाई
वांद्रे-वरळी सी लिंकमुळे बाधित होणाऱया वांद्रे, खार, जुहू-वर्सोवा येथील कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईचे काय? वांद्रे चिंबई येथे जेट्टी उभारली जात असून त्याला स्थानिक कोळी बांधवाचा विरोध आहे मग सरकार ही जेट्टी कुणासाठी बांधतेय, अशी विचारणा त्यांनी केला.
ईव्हीएमसाठी तरतूद
पुरवणी मागण्यांमधे सरकारने ईव्हीएम मशीनसाठी अडीच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेस ईव्हीएम मशीनविरोधात बोलणार नाही असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गात जागा गेलेल्या शहापूरच्या 85 वर्षीय सावित्रीबाई कदम यांना दोन वर्षे मोबदला मिळाला नाही. तो तातडीने मिळावा अशी मागणी करीत याकडे सरकारचे लक्ष वेधले.


























































