मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प

मुंबई आणि उपनगरात पावसाने मंगळवारी रात्रीपासून जोरदार तडाखा दिल्याने सखल भागात पाणी साचून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाची लोकल वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली. तर लांबपल्ल्याच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या तर काहींचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे अत्यावश्क सेवेच्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला. केवळ पश्चिम रेल्वेची जलद मार्गाची वाहतूक वांद्रे ते चर्चगेट दरम्यान दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाली तर धिम्या मार्गाची वाहतूक दुपारी 4 वाजता चर्चगेट ते विरार दरम्यान सुरू करण्यात आली.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मंगळवार रात्रीपासून पावसाने थैमान घातल्याने शीव, माटुंगा, परळ, करीरोड आणि वडाळा परीसरात पाणी साचल्याने मुंबई उपनगरीय लोकलची सेवा सकाळपासूनच ठप्प झाली. मध्य रेल्वेची मुंबई ते मनमाड ही गाडी रद्द करण्यात आली. एलटीटी ते गुवाहाटी, सीएसएमटी ते केएसआर बंगलुरू स्पेशल, सीएसएमटी ते लखनऊ, मुंबई ते भुवनेश्वर, मुंबई ते गडग स्पेशल या ट्रेनच्या वेळा बदलण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गाची वाहतूक वांद्रे ते चर्चगेट दरम्यान दुपारी 12.30 वाजता सुरू झाली. तर धिम्या मार्गाची वाहतूक दु.4 वा. चर्चगेट ते विरार दरम्यान पुन्हा पूर्ववत करण्यात यश आले. मध्य रेल्वेवर मात्र करीरोड आणि परळ तसेच वडाळा दरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वाशी दरम्यानची वाहतूक सायंकाळनंतरही सुरू करण्यात यश आले नाही. दादर ते कल्याण आणि वाशी ते पनवेल दरम्यान मध्य रेल्वेने शटल सेवा सुरू ठेवली होती.

बेस्टच्या 30 बसेस पाण्यात अडकल्या

हिंदमाता सिनेमा, गांधी मार्केट, मालाड सबे वे, खोदादाद सर्कल, भायखळा, वडाळा ब्रिज, किग्जसर्कल, मिलन सबवे आदी भागात प्रचंड पाणी साचल्याने बेस्ट 30 बसेस पाणी शिरल्याने बिघाड होऊन अडकून पडल्या. त्यातील 23 बसेसना पाण्याबाहेर काढण्यात यश आले तर पाणी जास्त असल्याने 7 बसेसपर्यंत मॅकेनिक पोहचू शकले नसल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. या मार्गांवरील बसेसची वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या