मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया ‘कोस्टल रोड’मधील दोन महाबोगद्यांचे काम आजपासून सुरू झाले. देशातील सर्वात मोठ्या ‘टनेल बोअरिंग मशीन’च्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत खोदण्यात येणाऱया या बोगद्यांचे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा 10.58 किमीचा कोस्टल रोड पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार – चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून 2300 टन वजनाचे अजस्र टनेल बोअरिंग मशीन आणले गेले आहे. या यंत्राचा व्यास 12.19 मीटर आहे. या मशीनच्या सहाय्याने प्रियदर्शनी पार्क येथून खोदण्यास सुरुवात करण्यात आली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राइव्ह) असणाऱया छोटय़ा चौपाटीपर्यंत असणार असून ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत. जमिनीच्या खाली 10 ते 70 मीटर हे बोगदे असतील. प्रत्येक बोगद्याची लांबी 2.07 किमी असेल. या महाबोगद्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट, एल अँड टी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष एस. व्ही. जोशी यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

जुलै 2023 पर्यंत काम पूर्ण करणार

पालिका 13 हजार कोटी रुपये खर्च करून संपूर्णपणे स्वबळावर कोस्टल रोडचे काम पूर्ण करणार आहे. इतक्या मोठय़ा रकमेचा प्रकल्प राबवणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली पालिका असल्याचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. या प्रकल्पाचे सध्या 20 टक्के काम पूर्ण झाले असून जुलै 2023 पर्यंत कोस्टल रोडचे काम पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

  • भूगर्भातील व वेगवेगळ्या ऋतुंमधील वातावरणातील बदलांचा विचार करुन बोगद्याचे बांधकाम केले जाईल. हे बोगदे भूकंपरोधक असतील. तसेच बोगदा व त्यातील भिंती या अतिउच्च तापमानाला सहन करु शकतील, अशा बांधल्या जाणार आहेत.
  • आग किंवा आपत्कालीन स्थितीत येथील तापमान सहन करण्याची क्षमता या भिंतीत असेल. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘क्रश बॅरियर’ तयार केले जाणार आहेत. या बोगद्यांचे आयुर्मान 120 वर्षांचे असेल.
  • दोन्ही बोगद्यांना जोडणारे ’छेद बोगदे’ (क्रॉस टनेल)ः आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास शेजारी-शेजारी असणाऱया दोन्ही बोगद्यापैकी एका बोगद्यातून दुस-या बोगद्यात सहजपणे जाता याके, यासाठी दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण तेरा 13 ‘छेद-बोगदे’ तयार करण्यात येणार आहेत.
  • आगीची दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्कयंचलित अग्निशमन यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत राहणार आहे. यामध्ये बोगद्याच्या अंतर्गत छताला जागोजागी ’प्रिंकलर्स’ बसविले जाणार आहेत. याचबरोबर ’एबीसी’ या प्रकारातील फायर एक्स्टींग्किशर, फायर हायड्रंट, फायर होज रील, फीक्स् फायर सिस्टम इत्यादी बाबीदेखील बोगद्यांमध्ये असणार आहेत.
  • बोगद्यातील रस्ते हे सिमेंट कॉक्रीटचे असणार आहेत. प्रत्येक बोगद्यामध्ये 3.3 मीटर लांबीच्या दोन मार्गिका या नियमित वाहतुकीसाठी असतील, तर 2.67 मीटर लांबीची मार्गिका ही आपत्कालीन वाहतुकीसाठी आरक्षित असेल.
  • वाहतूक सुरक्षेच्या व मानवी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोगद्यांमध्ये जागोजागी सीसीटीव्ही लावले जाणार असून संवाद साधण्यासाठी बोगद्यांमध्ये ध्वनिक्षेपण व्यवस्था देखील असणार आहे.