
महारेरा सलोखा मंचाच्या कार्यपद्धतीने प्रेरीत होऊन त्याचे अनुकरण आता बिहारच्या रेरा प्राधिकरणाने केले आहे. बिहार रेरा प्राधिकरणाअंतर्गत घर खरेदीदार ग्राहकांच्या तक्रारींचे सामंजस्याने आणि जलदगतीने निवारण करण्यासाठी पाटणा येथे तीन सलोखा मंचाची स्थापना करण्यात आली आहेत.
महारेराचे माजी अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांच्या सल्ल्यानूसार आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या सक्रीय मार्गदर्शनाखाली हे सलोखा मंच पाटणा येथे कार्यरत होत आहेत. बिहार रेराच्या या सलोखा मंचात ग्राहकांतर्फे मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रतिनिधी असेल तर विकासकांतर्फे क्रेडाई या विकासक संघटनेचा प्रतिनिधी असेल. सुरूवातीला बिहार रेरा सलोखा मंचाची तीन बेंचेस कार्यरत असतील. त्यानंतर आवश्यकतेनूसार यात वाढ करण्यात येईल, असे बिहार रेराचे अध्यक्ष नवीन वर्मा यांनी मुंबई ग्राहक पंचायतीला कळविले आहे.
रेरा कायद्यातील कलम 32 मधील तरतूदीनूसार महाराष्ट्रात सलोखा मंच स्थापन करण्याची मूळ कल्पना मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांची आहे. महारेराचे तत्कालिन अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी या कल्पनेला सक्रिय पाठिंबा दिला. या सलोखा मंचात घर खरेदीदाराच्या विकासकांविरूद्धच्या तक्रारी सामंजस्याने, रेरा कायद्याच्या चौकटीत राहून परंतू कायद्याचा कीस न काढता तक्रारदार आणि विकासकांना आमने -सामने आणून सलोख्याने आणि उभयतांच्या समंतीने सोडविल्या जातात.
75 टक्के तक्रारीचे निवारण
10 मार्च 2018 नंतर तीन वर्षांत सलोखा मंचापुढे आलेल्या तक्रारींपैकी 75 टक्क्यांहून अधिक तक्रारींचे परस्परात समझौता करार होऊन अवघ्या दोन ते तीन महिन्यात निवारण झाले. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, वसई, पालघर, नागपूर येथे एकूण 45 सलोखा मंच कार्यरत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघानेही केले निमंत्रित
पारंपारिक न्यायव्यवस्थेला समांतर अशी ही पर्यायी तक्रार निवारण व्यवस्था जगभर लोकप्रिय होत आहे. महारेरा सलोखा मंचाच्या यशाने केवळ बिहार रेरा प्राधिकरणच प्रेरीत झाले नसून संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा याची दखल घेत याबाबत जागतिक स्तरावर योगदान देण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीला निमंत्रित केले आहे.



























































