कोरोना परतीच्या वाटेवर, मुंबईत एका महिन्यात रुग्ण तिपटीने घटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मुंबईत कोरोना आता चांगलाच आटोक्यात आला असून नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये महिनाभरात तिपटीने रुग्ण घटल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये तर 50 हजार 6 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र रुग्णसंख्या घटत जाऊन नोव्हेंबर 25 हजार 960 आणि 30 डिसेंबरपर्यंत 9 हजार 262 रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे मुंबईतून कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रचंड गर्दीच्या मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत गेली. हजारोच्या संख्येने दिवसाला रुग्णनोंद होत असल्यामुळे शेकडो कोरोना हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत होती. यातच नियंत्रणात आलेल्या कोरोनाने दिवाळीनंतर पुन्हा उसळी घेतल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, जनजागृतीसह चेस द व्हायरस मोहिमेत जास्तीत जास्त रुग्णांच्या निकट संपर्काचा शोध घेऊन केलेली कार्यवाही, मिशन झीरो अंतर्गत वस्त्यावस्त्यांत जाऊन घेतलेली आरोग्य शिबिरे, मास्क न वापरणाऱयांविरोधात कारवाई, अॅम्ब्युलन्स आपल्या दारी यासारखे उपक्रम, प्रभावी सॅनिटायझेशन आणि दर्जेदार उपचारांमुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णसंख्याही घटली आहे.

ऑक्टोबरच्या तुलनेत पाच पट घट

नोव्हेंबरअखेर मुंबईत एकूण 2 लाख 83 हजार 460 रुग्ण होते. तर 30 डिसेंबर रोजी मुंबईत एकूण रुग्ण 2 लाख 92 हजार 722 आहेत. तर ऑक्टोबरअखेर मुंबईत 2 लाख 57 हजार 500 रुग्ण होते.

नोव्हेंबरमध्ये मुंबईत एकूण 25 हजार 960 रुग्ण आढळले. तर डिसेंबर महिन्यात 1 ते 30 तारखेपर्यंत केवळ 9 हजार 262 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये तब्बल 16 हजार 698 रुग्ण कमी आढळले आहेत.