
गेले काही महिने कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होत असतानाच या विषाणूच्या ‘आर व्हॅल्यू’ने पुन्हा एकदा मुंबईची चिंता वाढवली आहे. शहरात सप्टेंबरच्या अखेरीस कोरोनाची ‘आर व्हॅल्यू’ म्हणजेच एका रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याचे सरासरी प्रमाण 1 अंकाच्या पुढे गेले आहे. 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान कोरोनाचा संसर्ग पसरण्याला पुन्हा गती मिळाल्याचे आढळून आले आहे.
चेन्नईतील एका संस्थेने मुंबईसह इतर प्रमुख शहरांतील कोरोना संसर्गाचा अभ्यास करून अहवाल जारी केला आहे. त्यात मुंबईतील कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढल्याची आकडेवारी दिली आहे. सणासुदीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच ‘आर व्हॅल्यू’चे चिंता वाढवणारे आकडे पुढे आले आहेत. सप्टेंबरअखेरीस मुंबईची ‘आर व्हॅल्यू’ 1.03 वर पोहोचली आहे. शहरात यापूर्वी 14 जुलैला कोरोनाच्या 635 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला सर्वाधिक 629 नव्या रुग्णांची नोंद झाली. मागील काही महिने थंड पडलेला कोरोनाचा फैलाव अचानक वाढल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
‘आर व्हॅल्यू’चा चढ–उतार
मुंबईची ‘आर व्हॅल्यू’ 10 ते 13 ऑगस्टदरम्यान 0.70 होती. ती 13 ते 17 ऑगस्टदरम्यान 0.95 पर्यंत वाढली. n पुढे 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत आणखी वाढ होऊन ‘आर व्हॅल्यू’ 1.09 पर्यंत पोचली. n नंतर 25 ते 27 सप्टेंबरदरम्यान ‘आर व्हॅल्यू’ 0.95 पर्यंत खाली आली. ही पातळी 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान 1.03 पर्यंत वाढली.
‘आर व्हॅल्यू’ म्हणजे नेमके काय?
‘आर व्हॅल्यू’ म्हणजे रिप्रोडक्शन संख्या. या संख्येच्या आधारे संसर्गाचा वेग मोजला जातो. कोरोनाच्या एका रुग्णापासून किती लोकांना संसर्ग झाला ते यातून लक्षात येते. ‘आर व्हॅल्यू’ जर एकपेक्षा कमी असेल तर विषाणू धिम्या गतीने फैलावत असल्याचे म्हटले जाते. जर ‘आर व्हॅल्यू’ एकच्या पुढे गेली तर एका रुग्णापासून इतरांपर्यंत वेगाने संसर्ग पसरत असल्याचे स्पष्ट होते. ‘आर व्हॅल्यू’ एकच्या पुढे जाणे याला महामारीची पायरी मानले जाते.
देशात 95 कोटी लोकांचे लसीकरण; लवकरच 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण
देशभर कोरोना लसीकरणाने चांगला वेग पकडला आहे. आतापर्यंत 95 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले असून 100 कोटी लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट डिसेंबरपूर्वीच गाठले जाईल, अशी चिन्हे आहेत. पेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट करीत लसीकरणाची आकडेवारी जाहीर केली. सरकारने मार्च 2022 पर्यंत 100 कोटी डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ‘फुल्ल स्विंग’मध्ये सुरू आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.


























































