रुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश

कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यासह मुंबईत राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला आता चांगलेच यश येत असून अवघ्या आठ दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला आहे. ही मोहीम सुरू झाली तेव्हा मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 54 दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी आता वाढून 61 दिवस झाला आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे. त्याला चांगलेच यश मिळत असले तरी ऑगस्टच्या अखेरीस पुन्हा एकदा मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामध्ये रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होत आला आहे. 26 ऑगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 93 दिवसांवर होता. मात्र तो 31 ऑगस्टला 84 दिवसांपर्यंत खाली आला. हे प्रमाण आणखी झपाट्याने कमी होत गेले. 2 सप्टेंबरला 76 दिवस तर 12 सप्टेंबरला दुपटीचा कालावधी थेट 58 दिवसांवर आला. 15 सप्टेंबर रोजी ‘माझे कुटुंब, माझी मोहीम’ ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली तेव्हा हा कालावधी 54 दिवसांवर आला होता. मात्र यानंतर पालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना केल्या जात असल्यामुळे दुपटीचा कालावधी वाढू लागला आहे. केवळ आठ दिवसांत यात वाढ झाली असून 23 सप्टेंबर रोजी दुपटीचा कालावधी वाढून 61 दिवसांवर पोहोचला आहे.

अशी होतेय अंमलबजावणी
– `माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचारी व दोन स्वयंसेवक असलेल्या तब्बल पाच हजार टीम मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, सर्वेक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक कार्यवाही करीत आहेत.
– या मोहिमेत पॉझिटिव्ह रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टचा शोध घेण्याचे प्रमाण 10-15 हजारांवरून 20 हजारांपर्यंत वाढवण्यात आले आहे. शिवाय कोरोना चाचण्यांचे प्रमाण 10 हजारांवरून 16 हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत 22 सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या 10 लाख 35 हजार 440 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या