आता लढत मुंबई क्रिकेटसाठी, उद्या एमसीएची निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. गुरुवार, 20 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून तीन गट रिंगणात उतरल्याने निवडणूक  चुरशीची होणार असा जाणकारांचा अंदाज आहे.

शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार दीपक पाटील संयुक्त सचिवपदी, तर विहंग सरनाईक मुंबई प्रीमियर लीगच्या गव्हार्ंनग कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच उपाध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज न भरल्यामुळे या पदासाठी मतदान होणार नाही. त्यामुळे आता 13 जागांसाठी 33 उमेदवार आपले भाग्य अजमावणार आहेत.  एमसीएचे 329 सदस्य या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार असून 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत 95 टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे.

मिलिंद नार्वेकरांना बीसीसीआयच्या दिग्गजांकडून शुभेच्छा

ऍपेक्स कौन्सिल सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या शिवसेना सचिव आणि  मुंबई टी-20 गव्हार्ंनग कौन्सिलचे माजी चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी आज बिनविरोध निवडून आलेल्या बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांचे अभिनंदन केले. पण या दिग्गजांनी नार्वेकरांनाही गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.