
देशातील अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची 28 सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. अत्यंत प्रतिष्ठsच्या अशा एमसीए अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरणार आहेत. 1983 च्या विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्यासोबत विजय पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर व नवीन शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे वृत्त आहे.
एमसीएवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता. कालच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी मुक्काम ठोकून असल्याचे लक्षात येताच आशीष शेलार माघारी फिरले. मात्र आज सकाळी आशीष शेलार यांनी अखेर शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. पुढील काही दिवसांत या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
























































