
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेकायदेशीर शस्त्रप्रकरणी अटकेनंतर 32 वर्षांपासून फरार असलेल्याला अखेर गुन्हे प्रकटीकरण कक्ष 8 ने अटक केली. शिवाजी शिवराम शिंदे असे त्याचे नाव आहे. ‘भाऊ’ या शब्दावरून पोलिसांनी अंधेरी परिसरात शोध घेऊन शिंदेला अटक केली. अटक करून त्याला न्यायालयात हजर केले होते.
शिंदे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात 1985 साली भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. एक देशी कट्टा त्याच्याकडे मिळाला होता. अटकेनंतर तो दोन वर्षे न्यायालयात गेला होता. त्यानंतर तो न्यायालयात तारखेला हजर राहत नव्हता. त्याच्या विरोधात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यानी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याच्या अटकेकरिता युनिट 8 ने मोहीम हाती घेतली. सहायक पोलीस आयुक्त भूषण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर, पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, चंद्रकांत जगताप, पोलीस अंमलदार रवींद्र माने, जयेंद्र कानडे, प्रकाश मळेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांकडे अपूर्ण पत्ता होता. तसेच शिंदेला अटक केली तेव्हा तो 21 वर्षांचा होता. त्यामुळे नेमकी फरार व्यक्ती कुठे असेल हे पोलिसांसमोर कोडे होते. फरार असलेली व्यक्ती अंधेरी पूर्व परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. फरार असलेली व्यक्ती ही त्या परिसरात ‘भाऊ’ या नावाने परिचित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण तोच भाऊ आहे जो 32 वर्षांपासून फरार होता हे स्पष्ट होत नव्हते. अखेर पोलिसांनी त्याला चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. अखेर शिंदेने कबुली दिली.
























































