
मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश देतो सांगून महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱया दोघांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. निखिल चंगाणी आणि जुगल सचदे अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या महिला डॉक्टर आहेत. त्या उपनगरातील एका सरकारी रुग्णालयात काम करतात. त्यांना पी,जी शिक्षणासाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी त्यानी नीटची परीक्षादेखील दिली होती. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मेसेज करून मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तक्रारदाराना पुन्हा मेसेज आला. मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेशासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने 50 लाख रुपये दिले. पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने महिलेने एकाला विचारणा केली. ते दोघे महिलेला उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यानंतर त्या दोघांनी मोबाईल बंद करून ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेंद्र नेर्लेकर, सहाय्यक निरीक्षक विनोद पाटील, नितीन अणेराव, मनोज खोत यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी काwशल्याचा वापर करून दोघांची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांचे पथक जयपूर येथे गेले. तेथून त्या दोघांना अटक करून मुंबईत आणले. त्या दोघांनी अन्य कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास जोगेश्वरी पोलीस करत आहेत.






























































