स्पायडरमॅन स्टाईलने करायचा चोरी  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली येथे उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडीप्रकरणी तिघांना समतानगर पोलिसांनी अटक केली. चेतन राठोड, दीप पांचाळ आणि अंबिका राठोड अशी त्यांची नावे आहेत. चेतन हा सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून इमारतीत शिरतो. त्यानंतर स्पायडरमॅन स्टाईलने वर चढून तो घरफोड्या करतो. चेतन हा शाळेत जलतरणपटू होता. नशेच्या आहारी गेल्यावर तो चोऱया करू लागला. त्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

तक्रारदार हे कांदिवली येथील एका उच्चभ्रू इमारतीत राहतात. 17 जूनला रात्री अज्ञात चोरटा त्यांच्या घरात शिरला. चोरटय़ाने घरातून 1 लाख 97 हजारांचे दागिने चोरून पळ काढला. दुसऱया दिवशी तक्रारदार हे बेडरूममध्ये गेले तेव्हा घरफोडीचा प्रकार समोर आला. त्याने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण राणे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल भगत, निजाई, पाटणे, गायकवाड, अहिवले यांच्या पथकाने तपास सुरू केला.  

उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या चोरीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. इमारतीत सुरक्षा रक्षक असतानाही चोरी झाल्याने नेमका चोर कोण, हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेज व खबऱयाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चेतनला अंधेरी येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत दीपचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनी ते सोने अंबिकाला विक्रीसाठी दिले होते. तिलादेखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्या तिघांच्या अटकेने दोन गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.  

एका मिनिटात चढतो इमारतीत  

चेतन हा शाळेत असताना जलतरणपटू होता. त्याने अनेक स्पर्धांत भाग घेतला होता. तो नशेच्या आहारी गेला. चेतन हा उच्चभ्रू इमारतीत येऊन रेकी करतो. रेकी केल्यावर सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून इमारतीच्या भिंतीवरून चढून तो आत येतो. सोसायटीमधील लोखंडी पाइपवरून तो स्पायडरमॅन स्टाईलने वर जातो. चेतन हा एका मिनिटात चौथ्या मजल्यावर गेला. त्यानंतर तो तिसऱया मजल्यावर तक्रारदार यांच्या घरी आला, तर दीप हा सोसायटीबाहेर रेकी करण्याचे काम करतो. चोरीनंतर ते दोघे पैसे वाटून घेतात. त्या पैशातून ते नशा करतात.