
ऑनलाईन पोर्टलच्या रिचार्जवर अधिक कमिशन मिळेल असे सांगून आश्रमशाळेतील सेवकाची फसवणूक झाली आहे. 2 लाख 32 हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
बोरिवली येथे राहणारा तरुण हा आश्रमसेवक म्हणून काम करतो. गेल्या महिन्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. एका ऑनलाईन पोर्टल पंपनीला अर्धवेळ आणि पूर्णवेळ नोकरीसाठी माणसे हवी आहेत. तसेच नोकरीसोबत दिवसाला एक ते पाच हजार रुपये कमिशनदेखील मिळेल अशा ठगाने भूलथापा मारल्या. कामासाठी इच्छुक असल्याने तरुणाने होकार दर्शवला. त्यानंतर त्या तरुणाने मोबाईलवर आलेल्या त्या लिंकवर त्याची माहिती अपलोड केली.
ठगाने त्याला काही टास्कदेखील दिले. एका ऑनलाईन पोर्टलच्या कार्डवर रिचार्ज केल्यावर चांगले कमिशन मिळेल असे त्याला सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तरुणाने तेथे गुंतवणूक केली. सुरुवातीला ठगाने काही रक्कम व्याज म्हणून त्याच्या बँक खात्यात जमा केली होती. ठगाने तरुणाला आणखी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. अधिक कमिशन मिळेल या हेतूने त्याने 2 लाख 32 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या खात्यात जास्तीची रक्कम जमा झाली नव्हती. तसेच त्याला ती रक्कम काढता येत नव्हती. ठगाने तरुणाला आणखी रक्कम भरण्यास सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्याने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.






























































