रात्री घरफोडी करणारी टोळी गजाआड, चोरीचा सर्व ऐवज हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथील एक कुटुंब दुबईला गेलेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून सोन्या-चांदीचे दागिने असा 11 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या टोळीला भायखळा पोलिसांनी जेरबंद केले. आरोपी हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

अब्दुल काझी व त्यांचे कुटुंबीय दुबईला गेलेले असल्याने त्यांचे घर बंद होते, मात्र 7 नोव्हेंबर रोजी बंद घराचे कुलूप उचकटून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर भायखळा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत व निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास माने, सचिन पाटील व पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी वेगवेगळय़ा मार्गाने मुंब्य्राला गेल्याचे व ते अभिलेखावरील सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर ते मुंब्रा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून युसूफ शेख, महारूफ शेख, हैदर शेख व आसिफ शेख अशा चौघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून चोरीचे सर्व ऐवज हस्तगत करण्यात आले.