
बदलापूर परिसरात गांजाची तस्करी करणाऱया सुनील भंडारीला अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पुण्यात फिल्डिंग लावून अटक केली. त्याच्याकडून एनसीबीने 12 किलो गांजा जप्त केला. कोणाला संशय येऊ नये म्हणून सुनीलने तो गांजा गाडीच्या पुढच्या सीटच्या खाली लपवला होता.
एनसीबीने मुंबई, ठाणे, बदलापूर परिसरात सतत कारवाई करून ड्रग्ज तस्कराचे कंबरडे मोडले आहे. बदलापूर परिसरात काही जण गांजा तस्करी करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीनंतर एप्रिल महिन्यात एनसीबीने बदलापूर येथे सापळा रचला. एका गाडीतून 14 गांजाची पाकिटे जप्त केली होती. गांजा तस्करी करणाऱया दोघांना एनसीबीने अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत सुनीलचे नाव समोर आले. एनसीबीचे अधिकारी सुनीलचा शोध घेत होते.
सुनीलला ड्रग्जसोबत पकडण्यासाठी एनसीबीचे अधिकारी काही दिवसांपासून फिल्डिंग लावून होते. तो पुण्यात गांजा तस्करीसाठी आल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने पुण्याच्या टोल गेटजवळ सापळा रचला. सापळा रचून एनसीबीने सुनीलची गाडी थांबवली. त्या गाडीतून 12 किलो गांजा आणि 1 लाख रुपये जप्त केले. लॉकडाऊन काळात कोणाला संशय येऊ नये म्हणून सुनीलने ती गांजाची पाकिटे गाडीच्या पुढच्या सीटखाली लपवली होती. गांजा तस्करीप्रकरणी सुनीलविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुनील हा गांजा कुठून आणत असायचा त्याचा तपास एनसीबी करत आहेत.

























































