
उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांना प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात अलीकडेच उघडकीस आले होते. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही यंत्रणा असली तरी तिचा उपयोग घटना घडून गेल्यानंतरच होतो. त्यामुळे मेट्रोप्रमाणे मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये देखील सीसीटीव्हींचे ‘लाईव्ह मॉनिटरिंग’ गार्ड आणि मोटरमनच्या डब्यातून करण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचविता येईल, असे म्हटले जात आहे.
चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात तयार होणाऱया प्रत्येक लोकलमध्ये यापुढे सीसीटीव्हीचे नियंत्रण व देखरेख करण्याची सोय मोटरमन आणि गार्डच्या डब्यात बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी रेल्वे बोर्डाने आयसीएफकडे केली आहे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय लोकलच्या डब्यांतून प्रवास करणाऱया महिला प्रवाशांना असुरक्षित वाटत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आल्याने त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
300 लोकलचे फुटेज तपासणे जिकरीचे
रेल्वेच्या ‘महिला स्पेशल’ लोकलना रेल्वे सुरक्षा बलाने महिला कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरविली आहे. प्रत्येक लोकलमध्ये महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी महिला पोलिसांची कमतरता जाणवत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे म्हणणे आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण 300 लोकल असून प्रत्येक लोकलमधील घटना घडून गेल्यानंतर प्रत्येक लोकलच्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासणे अवघड असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एसी आणि नॉन एसीमध्येही सुविधा हवी
मेट्रोच्या डब्यांमध्ये असलेल्या प्रत्येक सीसीटीव्हीच्या ‘लाईव्ह मॉनिटरिंग’ची सोय मोटरमन तसेच गार्डच्या डब्यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे काही आणीबाणीच्या स्थितीत डब्यांच्या आत काय सुरू आहे हे तातडीने पाहता येऊन त्याप्रमाणे पुढील निर्णय घेणे शक्य होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारची लाईव्ह मॉनिटरिंग करण्याची सोय उपनगरीय लोकलमध्ये का नको असा विचार पुढे आला आहे. त्यामुळे यापुढे एसी असो किंवा नॉन एसी लोकल चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात लोकलच्या सीसीटीव्हींचे लाईव्ह मॉनिटरिंग करण्याची सोय गार्डच्या डब्यात करण्याचे तंत्रज्ञान बसवूनच या लोकल पाठविण्यात याव्यात, असे सूत्रांनी सांगितले.
























































