
सामना प्रतिनिधी। मुंबई
नायर रुग्णालयातील रॅगिंग प्रकरणी आरोपी डॉक्टरांविरोधात हायकोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील मराठी मजकुराचा अनुवाद तसेच अभ्यास करण्यासाठी आरोपी डॉक्टरांच्या वतीने मंगळवारी न्यायालयाकडे आठवडाभराचा वेळ मागण्यात आला. हायकोर्टाने त्याला मंजुरी दिल्याने आरोपी डॉक्टरांचा तुरुंगातील मुक्काम आठवडाभर लांबणार आहे. दरम्यान, अटक आरोपींच्या जामीन अर्जावरील खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू झाले.
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली. रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या तिघीजणी तुरुंगात असून त्यांनी सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. सुनावणीवेळी आरोपी डॉक्टरांच्या वतीने बाजू मांडणाऱया ऍड. अभात पोंडा यांनी आरोपपत्रातील मराठी मजकुराचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्याचा अनुवाद करण्यासाठी न्यायमूर्तींकडे वेळ मागितला. ती विनंती हायकोर्टाने मान्य केली.





























































