देशातील वाऱयाची दिशा ओळखून शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

शरद पवार हवा का रुख भाप लेते है… म्हणजेच वारे कोणत्या दिशेने वाहतात हे पवारसाहेबांना आधीच कळते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सांगतिले होते. त्यांनी नरेंद्र मोदींची लाट आधीच ओळखली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली. हा शिवसेना व भाजपचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे पुण्यात पत्रकार परिषदेत जाहीर केले. शरद पवार यांच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, शरद पवार यांनी पराभवाच्या भीतीने उमेदवारी मागे घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या देशात नरेंद्र मोदी यांची लाट आहे. सध्या हवेचे रूप काय आहे हे शरद पवार यांनी ओळखले आणि माढामधून उमेदवारी मागे घेऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. हा शिवसेना-भाजप व मित्रपक्षांचा मोठा विजय आहे.