आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार! शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीच्या आडून आरोप करणाऱया भाजप नेत्यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा सुनावले. ‘ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करीत सुटली आहे. पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हिंमत असेल तर यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत. जर अरोप सिद्ध झाले नाहीत तर ईडीच्या कार्यालयासमारे आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही तर माझे नाव संजय राऊत नाही,’ असा थेट इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला.

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बेताल बडबड करणाऱया भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, ‘काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसेच मी आणि माझ्या पुटुंबासोबत हेच केले. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल, पण आरोप सिद्ध झाले नाहीत तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱयांना जोडय़ाने मारले नाही तर माझे नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितले आहे.’

फडतूस लोकांनी आरोप करावेत यासाठी समाजकारण केले नाही!

‘राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्षे काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केले. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही,’ असेही संजय राऊत यांनी सुनावले.

उडय़ा मारणाऱया माकडांशी संबंध नाही हे पक्षाने सांगावे

ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेलही, पण मला आणि माझ्या पक्षाला प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. जर कायद्याच्या पलीकडची भाषा असेल तर जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करीत आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? त्यांच्या पक्षाने सांगावे, आमचा या व्यक्तीशी संबंध नाही, असे सांगावे. ही माकडे उडय़ा मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही, असे त्यांनी सांगावे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतेही राजकारण नाही

सुरक्षा कपातीवरून सुरू असलेल्या टीकेवरही संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतेही राजकारण झालेले नाही. याआधी आमच्याही सुरक्षा काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. मागच्या वेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दाने तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते त्यामध्ये महत्त्वाचे लोक असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचे सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावे किंवा सूडबुद्धीने वागावे असा ट्रेण्ड राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे. पण अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे, असे कोणीही म्हणू शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

…तरच तीन पक्षांचे सरकार प्रदीर्घ काळ चालेल

‘विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद बदलले जात असून जी काही नावे आहेत त्यात नाना पटोलेंचे नाव असल्याचे मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱया एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचे सरकार प्रदीर्घ काळ चालणार आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.