
मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र या उत्सावावर कोरोनाने विरजण पाडले. त्यामुळे मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आरोग्योतसव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. सार्वजनिक मंडळांच्या या निर्णयाला आता समन्वय समिती देखील पुढे सरसावली आहे. समन्वय समितीच्या जोगेश्वरी ते वांद्रे येथील कोविड टास्क फोर्सतर्फे मुंबईकरांसाठी ऑनलाइन योगसाधना वर्गांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत गणेशभक्तांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी या योगवर्गांचे आयोजन केल्याची माहिती समन्कय समितीतर्फे देण्यात आली आहे.
कोरोनामुळे मुंबईत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले होते. तर त्याशिवाय आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यासाठी देखील त्यांनी गणेशोत्सव मंडळांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक मंडळांनी आरोग्य विषयक उपक्रमांची सुरुवात उत्सव काळात केली आहे. त्यानंतर आता समन्कय समितीने देखील पुढे येत योग शिबीराचे आयोजन केल्याची माहिती समन्वय समितीच्या कोविड टास्क फोर्सचे शिवाजी खैरनार यांनी दिली.
या उपक्रमासाठी श्याम नगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग व एफएफसीए फिटनेस क्लबचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती खैरनार यांनी यावेळी दिली. तर ज्या गणेशभक्तांना या योग शिबीरात भाग घ्यावयाचे असल्यास त्यांनी 9664443181 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन समन्वय समितीच्यावतीने केले आहे.
- 24 ऑगस्टपासून पाच दिवस चालणार योग शिबीर
- फेसबुक लाईव्ह आणि झूमच्या माध्यमातून सहभागी होता येणार
- गणेशभक्तांच्या आरोग्यासाठी केले आयोजन































































