
ध्वनिप्रदूषण नियमांचे योग्य ते पालन केले जात असले तरी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 2023 या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केवळ तीन दिवस ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी अन्यायकारक असून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत पाच दिवस ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी द्या, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सण-उत्सवाच्या काळात वर्षभरात 15 दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी ध्वनिप्रदूषण नियम आणि नियंत्रण कायद्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. वर्षभरातील हे 15 दिवस कोणते हे ठरवण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 2013 पासून चार दिवस सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली जाते, मात्र या वर्षी एक दिवस कमी करण्यात आला आहे. तसे न करता जिल्हाधिकाऱ्यांनी चारऐवजी पाच दिवस ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मुंबईतील सर्व मंडळांची एकमुखी मागणी आहे.
– नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती


























































