
सामना प्रतिनिधी। मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये तर जखमींना 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी न्यायाधीश व्ही.पी. पाटील यांनी ही याचिका केली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
14 मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 31 जण जखमी झाले. ठेकेदार तसेच पालिका अधिकाऱयांनी चुकीचा स्ट्रक्टचरल ऑडिट रिपोर्ट सादर केल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे मृतांना व जखमींना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या याचिकेत मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, पालिकेचे अन्य संबंधित अधिकारी यांच्यासह मध्य रेल्वेचे व्यवस्थापक आणि मुंबईचे महापौर यांनाही प्रतिवादी करण्यात आले असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होईल.
























































