
वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग नियंत्रित करून अपघातांना आळा घालण्यात येणार आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने प्रत्येक 500 मीटर अंतरावर गतिरोधक बसवले जाणार आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधकदर्शक फलक, डांबराच्या पृष्ठभागावर वाहने घसरू नये यासाठी त्याचा पृष्ठभाग खडबडीत केला जाणार असून रम्बलर्सची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
या उड्डाणपुलावरून 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहने चालवण्यास परवानगी आहे. मात्र चारचाकी व दुचाकी वाहनचालक खूप जास्त वेगाने वाहने चालवत असून त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत. त्याचबरोबर उड्डाणपुलावरील मोहित-पाटील नगर जंक्शन येथे उच्च दाबाच्या तारा कमी उंचीवरून जात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

























































