
कोरोनाच्या संकटातही मुंबईतल्या गोदी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. मुंबईतल्या गोदी कामगारांना 15 हजार 994 रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे. त्यामुळे गोदी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंदर व गोदी कामगारांना बोनस देण्याची मागणी अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे (कामगार) अध्यक्ष ऍड. एस. के. शेटये व जनरल सेव्रेटरी सुधाकर अपराज यांनी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार देशातल्या प्रमुख बंदरातील 25 हजार 939 बंदर व गोदी कामगारांना बोसन देण्याचे आदेश केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सचिव राजीव नयन यांनी आज सर्व पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांना दिले.
मुंबई बंदरात 6 हजार 430 कामगार असून त्यांना बोनस वाटण्यासाठी 10 कोटी 28 लाख रुपये खर्च येईल तर भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना बोनस वाटण्यासाठी पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाला 40 कोटी 9 लाख रुपये खर्च येईल अशी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.
























































