ऍम्ब्युलन्स चालकाकडे मिळाली अर्धा डझन बनावट लायसन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

रुग्ण नसतानाही विनाकारण सायरन वाजवत सिग्नल जंप करून जाणाऱया एका ऍम्ब्युलन्स चालकाला वांद्रे वाहतूक चौकीच्या कर्मचाऱयांनी अडविल्यावर एक धक्कादायक बाब समोर आली. त्या चालकाकडे लायसन्स मागितल्यावर त्याने एकामागे एक अर्धा डझन बनावट लायसन्स दिली. केवळ सात हजारांत एक लायसन्स घेतल्याचे त्याने सांगितले.

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दरेकर हे माहीम कॉजवे येथे कर्तव्यावर असताना त्यांना एक ऍम्ब्युलन्स सायरन वाजवत व सिग्नल तोडून येताना दिसली पण ऍम्ब्युलन्समध्ये रुग्ण नव्हता. त्यामुळे त्यांनी ऍम्ब्युलन्सला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे दरेकर यांनी कोंडूर जंक्शनवर असलेल्या प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, कॉन्स्टेबल संजीवकुमार सोनावणे व प्रमोद जाधव यांना कळविल्यावर त्यांनी ऍम्ब्युलन्स थांबवली. त्यानंतर दरेकर यांनी लायसन्स मागितल्यावर त्याने करण चौधरीच्या नावे असलेले लायसन्स दिले. पण त्यावरील नंबर तपासल्यावर ते लायसन्स श्रीआंश कोल्हापुरे याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नितीन पाटील यांनी ऍम्ब्युलन्स चालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव मनोजकुमार सांगितले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेली आणखी पाच बनावट लायसन्स काढून दिली. त्याने हे लायसन्स त्याच्या एका ओळखीच्या तरुणाकडून बनवून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी मनोजकुमारला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सहा बनावट लायसन्स जप्त केली आणि पुढील कारवाईसाठी त्याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले.

सात हजारांत पाहिजे त्याला लायसन्स

मनोजकुमारने सांगितले की, त्याचा ओळखीचा एक तरुण असून तो केवळ सात हजारांत पाहिजे त्याला लायसन्स मिळवून देतो. केवळ आपले नाव व फोटो द्यायचे. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मनोजला अटक केली. तो कोणाकडून लायसन्स घ्यायचा याचा पोलीस शोध घेत आहेत.