निवासी डॉक्टरांच्या संपाविरोधात हायकोर्टात याचिका; शुक्रवारी सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी। मुंबई

सरकारी महाविद्यालयात अनेकदा विद्यावेतन वेळेवर मिळत नाही, या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

निवासी डॉक्टरांनी पुकारलेला हा संप बेकायदा असून यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात डॉक्टरांनी संप करू नये असे स्पष्ट केले आहे. तसेच निवासी डॉक्टरंच्या संघटनेने यापुढे संप करणार नाही अशी लेखी हमी दिलेली आहे. असे असतानाही निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याने सामाजिक कार्यकर्ते अफक मांडविया यांनी ऍड. दत्ता माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.