मुंबईचे वास्तुवैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता वाघमारे

२० व्या शतकातील कोणत्याही नागरी वस्तीत मुंबईप्रमाणे एकाचवेळी चार नागरी स्थापत्यशैलींचा अंतर्भाव जगात कुठेही आढळून येत नाही. या इमारतीचे वेगळेपण यात आहे की ओव्हल मैदान परिसरात व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको स्थापत्यशैलीतल्या इमारती समोरासमोर उभ्या आहेत. व्हिक्टोरिया गॉथिक आणि डेको या शैलींचा मिलाफ मुंबईच्या कुशीत आजही श्वास घेताना दिसतो तो या इमारतींच्या रूपात.

मुंबई शहराला सध्या गगनचुंबी बांधकामांच्या विळख्याने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत मुंबईला तिच्या जुन्या वारशाचे जतन करण्यास प्रोत्साहित करणारी एक विलक्षण घटना नुकतीच घडली आहे. दक्षिण मुंबई परिसरातील इमारती ऐतिहासिक असून त्यात १९व्या शतकातील व्हिक्टोरियन ‘न्युओगॉथिक’ व २०व्या शतकातील ‘आर्ट डेको’ स्थापत्यशैलीतल्या इमारती आहेत. या इमारतींचा ३०जून, २०१८ रोजी ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला.

‘युनेस्को ’ ही संस्था १० विविध निकषांद्वारे ‘जागतिक वारसा स्थळांची ’ निवड करते. एखादा परिसर, स्मारक किंवा नैसर्गिक ठिकाण याचा नामनिर्देश ‘जागतिक वारसा स्थळ ’ निवडीच्या यादीत होण्यासाठी ही गोष्ट विचारात घेतली जाते की, त्या वास्तू अथवा ठिकाणाला असामान्य दर्जाचे जागतिक महत्त्व असावयास हवे. मुंबई परिसरातील व्हिक्टोरियन व आर्ट डेको पद्धतीच्या इमारतींनी युनेस्कोने लावलेल्या निवडीच्या दहा निकषांपैकी दोन निकषांची यशस्वीपणे पूर्तता केली आहे. व्हिक्टोरियन व आर्ट डेको पद्धतीच्या इमारती या जगभरात दिसून येतात. मात्र एकाच परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दोन्ही शैलींच्या इमारती या फक्त मुंबईतच आढळतात. या इमारती उत्तम मानवीय नगररचनेचे प्रतिनिधित्व तर करतातच, पण त्याव्यतिरिक्त कल्पकता आणि छोटया कालावधीत संस्कृती, स्थापत्य आणि तंत्रज्ञान यांची यशस्वीपणे झालेली देवाणघेवाण यांचे प्रतीक ठरल्या आहेत.

मुंबई परिसरातील इमारती ऐतिहासिक असून त्यात १९ व २०व्या शतकादरम्यान उक्रांत होत गेलेल्या चार स्थापत्यशैलींचा संगम आहे. जसजसा मुंबईचा हिंदुस्थानातील एक प्रमुख एक बंदर म्हणून विकास झाला आणि मुंबई शहर हिंदुस्थानातील इतर प्रमुख ठिकाणांशी लोहमार्गाने जोडले गेले तसतशी मुंबई ही हिंदुस्थानाची एक प्रमुख व्यापारपेठ बनली. या कालावधीत मुंबईत येणाऱया जगभरातील व्यापारी व पाहुणे यांमुळे संस्कृती, स्थापत्य आणि तंत्रज्ञान यांची यशस्वीपणे देवाणघेवाण झाली. आणि या सगळ्या घडामोडींचे प्रतिबिंब मुंबईतील स्थापत्यावरही दिसून येते. ‘आर्ट डेको’ शैलीच्या इमारतींमध्ये मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग व श्रीमंत नागरिकांच्या घरांचा तर ‘व्हिक्टोरियन’ इमारतींमध्ये सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, कोर्ट, बँका, म्युझियम व सार्वजनिक वाचनालये यांचा

समावेश आहे. इंग्रजी अमलात मुंबईचा जसजसा विस्तार होऊ लागला तसा मुंबईच्या नगररचना उपक्रमांतर्गत प्रथम मुंबई किल्ल्याच्या भिंती पाडण्यात आल्या आणि ओव्हल मैदानाभोवतालील परिसर सरकारी व सार्वजनिक इमारतींच्या बांधकामासाठी खुला करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, एल्फिन्स्टन कॉलेज या वास्तू मुंबईतील व्हिक्टोरिअन गॉथिक स्थापत्यशास्त्राrय काळाचे प्रतिनिधित्व करतात. इमारतींवरील उंच मनोरे, घुमट, टोकदार कमानी, प्राण्यांची तोंडे आणि महिरपींनी युक्त अशी छते व्हिक्टोरिअन गॉथिक स्थापत्यशास्त्र्ााची द्योतक आहेत. या वास्तूंमधील स्थापत्यात स्थानिक हवामान स्थितीला साजेसे सज्जे आणि थोडी ओसरीची जागा ज्याला आपण व्हरांडा म्हणतो अशा हिंदुस्थानी वैशिष्टांचाही समावेश असलेला दिसून येतो. म्हणजेच खरे तर व्हिक्टोरिअन गॉथिक ब्रिटिशांची शैली आहे पण पावसाच्या पाण्यासाठी उतरती छपरे आणि हवेसाठी झरोके ठेवण्याची स्थापत्यशैली स्थानिक आहे या इमारतींना हिंदुस्थानीयत्वाचा गंध आहे, याच कालखंडात मुंबईतील स्थापत्यकलेवर ‘इंडो-सार्सानिक’ स्थापत्यशैलीचाही प्रभाव दिसून येतो.

‘डो-सार्सानिक’ स्थापत्यशैली म्हणजे या शैलीत ‘व्हिक्टोरिअन गॉथिक’ आणि ‘भारतीय मुघल स्थापत्यशैली’ चा सुरेख संगम झालेला पाहावयास मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची इमारत (तेव्हाचे ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) तसेच पश्चिम रेल्वे मुख्यालय ही या ‘इंडो-सार्सानिक’ स्थापत्यशैलीची उत्तम उदाहरणे म्हणता येतील.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईचा बॅकबे रेक्लमेशन हा भूभाग तयार झाला. या भूभागाच्या अंतर्भावामुळे मुंबईत नागरीकरणाची जणू दुसरी लाटच आली! मग या वाढीव भूभागावर सरकारी कार्यालये, चित्रपट गृहे, शैक्षणिक संस्था, बँका, म्युझियम व सार्वजनिक वाचनालये यांच्या निर्मितीला मोठया प्रमाणावर सुरुवात झाली. या सर्व इमारती निओ-क्लासिकल आणि आर्ट डेको स्थापत्यशैलीचा होत्या. या इमारतींचे सज्जे त्यांच्या स्थापत्यशास्त्राrय वैशिष्टय़ांनुसार वक्राकार असल्याचे दिसून येतात. तसेच या इमारतींचा मुख्य रस्त्याला लागून असणाऱया दर्शनी भागांत एकजिनसीपणा दिसून येतो. मुंबईत नांदणाऱया संस्कृती, परंपरा त्यांच्या पाऊलखुणा या सर्व इमारतींच्या रूपात स्पष्ट दाखवतात हे त्या इमारतींचे अजून एक विशेष . याचाच प्रत्यय स्टँडर्ड चार्टर्ड बँक बिल्डींग, त्यानंतर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ज्या वास्तूत आहे तो सर कावसजी जहांगीर हॉल, इरॉस आणि रिगल ही चित्रपटगृहे, मुंबईची जान असणाऱया वैशिष्टय़पूर्ण मरीन ड्राईव्ह लगत असणारी नागरिकांची राहती घरे या सर्वांमध्ये येतो. मुंबईप्रमाणे जगभरात सांगावयाचे झाल्यास अमेरिकेतील मियामी येथे आर्ट डेको पद्धतीच्या इमारती एकाच परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दिसून येतात.

बहरीनमधील मनामा येथे ३०जून,२०१८ रोजी संपन्न झालेल्या ‘युनेस्को’ च्या जागतिक वारसा समिती बैठकीच्या ४२ व्या सत्रात, जवळजवळ ९४ व्हिक्टोरियन ‘न्युओगॉथिक’ व ‘आर्ट डेको’ इमारतींची यादी सादर केली गेली. या सर्व इमारती फोर्ट, कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील आहेत. या इमारतींना ‘जागतिक वारसा स्थळे’ हे बिरुद आता प्राप्त झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरीला जागतिक वारसा स्थळांच्या नकाशावरही मानाचे स्थान मिळाले असून, यापूर्वी १९८७ साली शहरातील एलिफंटा गुंफा व २००४ साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा या यादीत समावेश झाला आहे. यायोगे महाराष्ट्र राज्याला हिंदुस्थानातील इतर राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे हिंदुस्थानातील एकूण ३७ जागतिक वारसा स्थळांपैकी पाच स्थळे नोंदली जाण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या पाच स्थळांपैकी एकटय़ा मुंबईतील तीन स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे हे विशेष.

जगभरात २० व्या शतकातील कोणत्याही नागरी वस्तीत मुंबईप्रमाणे एकाचवेळी चार नागरी स्थापत्यशैलींचा अंतर्भाव असलेला आढळून येत नाही. या इमारतीचे वेगळेपण यात आहे की ओव्हल मैदान परिसरात व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको स्थापत्यशैलीतल्या इमारती एकमेकांच्या समोरासमोर उभ्या आहेत. व्हिक्टोरिया गॉथिक आणि डेको या शैलींचा मिलाफ महाराष्ट्रातील मुंबईच्या कुशीत आजही श्वास घेताना दिसतो तो या इमारतींच्या रूपात. या इमारतींची स्थापत्यशैली, त्यांच्या एकजिनसीपणा किंवा त्या इमारतींच्या बाजूचा परिसर हा इतिहास, कला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान दृष्टिकोनातून सार्वत्रिक मौल्यवान आहे.त्यामुळे हा वारसा त्या स्थानाचे महत्त्व तर दर्शवतोच परंतु याशिवाय तिथे राहणाऱयाया स्थानिक लोकांच्या जीवनमानाचा एक अविभाज्य भाग आहे . तिथे नांदणाऱया संस्कृती, मुंबईकरांच्या तीन पिढयांची परंपरा या वारसा रूपात त्यांच्या पाऊलखुणा या इमारतींच्या रूपात स्पष्ट दाखवतात. ओव्हल मैदान परिसरात एक नुसता फेरफटका मारला तरी या इमारतींकडे पाहून मुंबईला भेट देणाऱया पाहुण्यास तिच्या इतिहासाची कल्पना येते. या जागतिक वारशाचे महत्त्व लक्षात घेऊन आता युनेस्को त्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आर्थिक हातभार लावणार हे या इमारतींच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील समावेशाचे महत्व आहे.

या जाहीर झालेल्या इमारतींच्या यादीतील अनेक इमारतींना या पूर्वीच ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीने’ मुंबईचा ऐतिहासिक वारसा सांगणारी ठिकाणे म्हणून घोषित केले होते. पण सरकारने या परिसरातील इमारतींना एफ. एस. आय. (एफ.एस.आय. म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स यालाच मराठीत चटईक्षेत्र निर्देशांक असे म्हणतात) वाढवून दिल्याने त्या जुन्या इमारती पाडून त्याजागी आकाशचुंबी मनोरेड टॉवर बांधून त्यावर अमर्याद नफा कमविण्याची स्वप्ने काही विकासक पाहू लागले. पण आता या इमारतींना जागतिक ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता मिळाल्याने विकासकांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे.

या इमारतींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा एक मार्ग म्हणजे त्या इमारतींच्या मालकांना काही प्रोत्साहनपर सवलती उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना इमारतींच्या टुकार दर्जाच्या वाढीवकामांपासून परावृत्त करणे हा आहे कारण सुमार दर्जाच्या वाढीव बांधकामामुळे मूळ इमारतीचे सौंदर्य आणि एकसंधता धोक्यात येते. मुंबईमधील वॉटसन हॉटेल हे मुंबईतील गल्ली गल्लीतून उलगडत जाणाऱया ऐतिहासिक वारशाचे एक लक्षणीय उदाहरण म्हणता येईल. हे हॉटेल हिंदुस्थानातील सर्वात जुने आणि ओतीव पोलादापासून बनविलेले आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे १८६० ते १८६३ दरम्यान इंग्लंडमध्ये या हॉटेलच्या पोलादी सांगाडयाची निर्मिती केली गेली तो सांगाडा समुद्रमार्गे मुंबईत आणून आत्ता ते हॉटेल जेथे उभे आहे त्या ठिकाणी जोडला गेला!

मागील शतकापासून विशिष्ट इमारतींना लागू झालेले मुंबई शहरातील किचकट असे भाडेपट्टी कायदे तसेच लांब मुदतीसाठी जमीन, इमारत, इ.भाडय़ाने देण्याचा घेण्याच्या कायदेशीर करारांचे किचकट स्वरूप या गोष्टीही मुंबईतील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ऱहासाला कारणीभूत होतात. तसेच ऐतिहासिक वारसा स्थळांच्या इमारतीत अनेक व्यापारी कार्यालयांना भाडेपट्टीवर जागा देण्यात आली आहे. काही जागतिक वारसा स्थळ इमारतींत तर अशी व्यापारी कार्यालये ठासून भरलेली दिसतात. तसेच सरकारचा या व्यापाऱयांकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन आणि त्याअंतर्गत व्यापाऱयांना दिल्या गेलेल्या उदार सवलतींमुळे या जागतिक वारसा इमारतींना धोका पोहोचताना दिसतो.

आता दक्षिण मुंबई परिसरातील या इमारती ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत मुंबईत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन व्यवसाय विकसित करण्याच्या कामी जोमाने लागणे ही आता काळाची गरज आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहितीजालावरील संकेतस्थळावर तसेच खाजगी पर्यटन संस्थांच्या प्रवासी कार्यक्रमात मुंबईच्या या संपन्न वारशाचा उचित असा उल्लेख केलेला आढळत नाही. भेट देण्याच्या ळांमध्ये मुंबईच्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि वारसा सांगणाया या जागतिक दर्जाच्या इमारतींचा उल्लेख अगदी निसटता केलेला दिसतो! त्यामुळे अनेक देशी आणि परदेशी पर्यटक माहितीच्या अभावी या वारसा स्थळांपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. शहराचा खरा इतिहास जतन करून ठेवणाऱया या वास्तूंकडे पर्यटन क्षेत्राचे दुर्लक्ष होते आहे.

(लेखिका क्युरेटर आणि पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)