
आर्थिक अफरातफर प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चंडोलेला सोमवारी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी टॉप्स ग्रुप सिक्युरिटी कंपनीचा प्रवर्तक चंडोले आणि माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशीधरन या दोघांना अंतरिम जामिनाचा दिलासा दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांसाठी सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामात आर्थिक अफरातफर केल्या प्रकरणी ईडीने टॉप्स ग्रुप सिक्युरिटी पंपनी व कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चंडोलेच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण, अॅड. प्रियांका दुबे आणि अॅड. मेघा गुप्ता यांनी बाजू मांडली. त्यांनी विजय मदनलाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अन्वये असलेल्या हक्कांकडे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती कर्णिक यांनी अर्जदारांना अंतरिम जामीन मंजूर केला.

























































