पत्नीच्या डोक्यात हातोडा घालत पतीची मालगाडीखाली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून सुरू असलेली दररोजची मारहाण असह्य झाल्याने घर सोडून जाणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने हातोड्याचे घाव घातल्याची घटना डोंबिवली पश्चिम येथे घडली. या घटनेनंतर पतीने घरातून निघून जात मालगाडीखाली आत्महत्या केली. राज हर्ष अगरवाल ऊर्फ गुप्ता (50) असे त्याचे नाव असून पत्नीवर तातडीचे उपचार सुरू आहेत.

काजल अगरवाल आणि राज अगरवाल हे दाम्पत्य दोन मुले आणि राजच्या वडिलांसह जुनी डोंबिवली परिसरातील लक्ष्मी निवास या इमारतीत राहतात. रोजच्या भांडणाला कंटाळून काजलने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच ती सामान नेण्यासाठी घरी आली होती. त्यावेळी राजने तिच्यावर हातोड्याने मागून हल्ला केला.

जखमी अवस्थेत असलेल्या काजलने खाली थांबलेल्या आपल्या मैत्रिणीला फोन करून बोलवून घेतले. तिच्या डोक्याचे हाड प्रॅक्चर आणि खूप रक्तस्राव झाल्याने तिला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी काजलवर जीवघेणा हल्ला करून घरातून निघून गेलेल्या राज याने भिवंडी येथील खारगाव वसईमार्गावर मालगाडीखाली रात्री आत्महत्या केल्याचे विष्णूनगर पोलिसांनी सांगितले.