
पहिल्या डावात मिळवलेल्या 36 धावांच्या आघाडीमुळे मुंबईने आपले उपांत्य फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित केले होते, तर आज तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेने दहाव्या विकेटसाठी 232 धावांची अभूतपूर्व भागी रचत मुंबईला दुसऱया डावात 569 धावांचा एव्हरेस्ट उभा करून दिला होता. त्यामुळे बडोद्याला 55 षटकांत 606 धावांचे अशक्य आव्हान दिले होते. मात्र बडोद्याने 30 षटकांत 3 बाद 121 अशी मजल मारून आपला पराभव मान्य केला. मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली असून आता येत्या 2 ते 6 मार्चदरम्यान मुंबईतील बीकेसीतील एमसीए अॅकेडमीत मुंबई विरुद्ध तामीळनाडू, तर नागपूरला विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश अशा लढती रंगतील.




























































