कलिना कॅम्पसमधील सांस्कृतिक भवन शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सांस्कृतिक भवनाचे ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आर्टस् ऍण्ड कल्चरल सेंटर’ असे अजूनही अधिकृतपणे नामकरण झाले नसल्याची बाब विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाली आहे. या कल्चरल सेंटरसाठी प्रशासकीय मंजुरी व निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला असतानाही अजूनही सांस्कृतिक भवनावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाची मोहर उमटलेली नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे असलेल्या सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणाऱया ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस् ऍण्ड कल्चरल सेंटर’साठी राज्य सरकारने 9 कोटी 16 लाख 47 हजार 455 रुपयांचा इतका निधी मंजूर केला आहे. त्याबाबतचा शासन आदेश 5 ऑगस्ट 2019 रोजी जारी केला आहे. या गॅलरीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य असे कलादालन उभारण्यात येणार आहे.

कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कला, संस्कृती आणि साहित्याचे केवळ प्रणेते नव्हते तर सिद्धहस्त प्रतिभाशाली कलावंत होते. शिवसेनाप्रमुखांचे समाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रांतील योगदान बहुमूल्य असून सर्वच जनसामान्यांची त्यांच्याप्रति आजही आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसुड ओढले आहेत. ‘मार्मिक’सारख्या व्यंगचित्र साप्ताहिकामधून संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक संकुलास ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस् ऍण्ड कल्चरल सेंटर’ असे नाव देण्याची सूचना तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली होती.

  • ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस् ऍण्ड कल्चरल सेंटर’ असे नाव देण्याबाबत तसेच अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सरकारने मंजुरी दिली आहे. या कामासाठी निधीच्या मंजुरीसह शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी व आवश्यक निधी उपलब्ध असतानाही यामध्ये होत असलेल्या विलंबास जबाबदार असणाऱया संबंधित अधिकाऱयांवर तातडीने कारवाई करावी आणि या सांस्कृतिक केंद्राचे नामकरण करावे अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती.
  • उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या लेखी उत्तरात या सांस्कृतिक केंद्राचे अधिकृतपणे नामकरण झालेले नाही, मात्र सांस्कृतिक केंद्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी प्रभारी संचालकांची ऑक्टोबर 2020 पासून एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.