कुंभमेळय़ातून विद्यार्थ्यांनी घेतले व्यवस्थापनाचे धडे

सामना प्रतिनिधी। मुंबई

व्यवस्थापनाचे धडे केवळ वर्गातील शिकवण्यांमधून मिळत नाहीत तर प्रत्यक्ष समाजात जाऊनही त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कोहिनूर बिझनेस स्कूलमधील विद्यार्थ्यांनी त्यासाठी चक्क प्रयागराज येथील कुंभमेळय़ाला हजेरी लावली. देशविदेशातून येणारे भाविक आणि पर्यटकांशी संवाद साधतानाच गर्दीचे नियंत्रण, आरोग्य शिबिरे आणि लाखो भाविकांच्या राहण्याच्या व्यवस्थेचे नियोजन यांचा अभ्यास केला.

संशोधनपर शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून कोहिनूर बिझनेस स्कूलमधील व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाचे दहा विद्यार्थी कुंभमेळय़ाला गेले होते. कुंभमेळय़ाचे आयोजन शिस्तबद्ध आणि सुनियोजित होते असा अनुभव त्यांनी सांगितला. गर्दीचे व्यवस्थापन करतानाच संभाव्य धोके कसे टाळावे यासाठी आयआयटी मद्रासमधील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या प्रणालीचा अभ्यासही त्यांनी केला.

गर्दीचे नियंत्रण, आरोग्य शिबिरे व लाखोंच्या निवास व्यवस्थेचा केला अभ्यास

विविध राज्ये आणि देशांमधून आलेल्या कोटय़वधी भाविकांची गर्दी होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडत नाही याचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी केला. ‘दायित्व’ या उपक्रमांतर्गत त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात आलेल्या ‘नेत्र कुंभ’ या नेत्रतपासणी शिबिरात सहभागी होऊन गरजू रुग्णांची सेवा केली. एवढय़ा गर्दीमध्ये कुणाची चुकामूक झाली तर त्याचा शोध घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रणेची माहितीही त्यांनी घेतली.