
कुरार भुयारी मार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. कुरार गाव ते मालाड रेल्वे स्थानक पूर्व हा प्रवास नागरिकांना दोन टप्प्यांत करावा लागत आहे. सदर प्रवास एका टप्प्यात व्हावा म्हणून शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पश्चिम द्रुतगती मार्गाखाली असलेला भुयारी पादचारी मार्ग वाहनांकरिता वाहतुकीयोग्य करण्याबाबत एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. सदर मार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. तसेच काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी नोडल अधिकाऱयाची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कुरार परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रात वाहतूक काेंडीची मोठी समस्या असून कुरार गाव ते मालाड रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास दोन टप्प्यांत करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेत आमदार सुनील प्रभू यांनी सदरचा प्रवास एकाच टप्प्यात व्हावा म्हणून पादचारी भुयारी मार्गाचे रुंदीकरण करून वाहनांसाठी वाहतुकीयोग्य करावा म्हणून एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार एमएमआरडीएने सदर मार्गाचे काम हाती घेतले आहे, पण येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने सुरुवातीला भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू होते, तसेच वाहतूक पोलीस, मेट्रो प्राधिकरण, महापालिका यांच्याशी समन्वय साधून काम करावे लागत आहे. अनेकदा वाहतूक विभागाची वेळेत परवानगी मिळत नसल्याने कामाला विलंब होत आहे. त्याची दखल घेत सुनील प्रभू यांनी सदर काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून झालेले काम आणि प्रस्तावित काम याचा आढावा घेण्याबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. यावेळी सदर मार्गाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल असे एमएमआरडीएने स्पष्ट केले. तेव्हा सदर मार्ग डिसेंबरअखेर पूर्ण झाल्यास नागरिकांना नव्या वर्षाची भेट देता येईल असे सुनील प्रभू यांनी सांगितले. त्यानुसार सदर भुयारी मार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.
लोखंडवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित रस्त्याचे काम सुरू होणार
कांदिवली लोखंडवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्यासाठी वन विभागातून जाणाऱया भागातील वन जैव विविधतेला धक्का न लावता कसे करता येईल याबाबत निविदापूर्व चाचणी सुरू आहे. तसेच पुढील तीन महिन्यांत वन विभागाच्या एनओसीसह निविदा प्रक्रिया पूर्ण होतील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.


























































