खरी कसोटी उद्यापासून, लोकलला तुरळक गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना 15 ऑगस्टपासून प्रवासाचे स्वातंत्र्य मिळाले असले तरी आज लोकलला तुरळक गर्दी झाल्याचे चित्र होते. उद्या, सोमवारीही पारसी नववर्षानिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने म्हणावी तशी गर्दी होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मंगळवारपासून कामकाजाचा दिवस सुरू होत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवत 95 टक्के फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लोकल सेवेवर पुन्हा 22 एप्रिलपासून निर्बंध आल्यानंतर नोकरदार वर्गाचे हाल होत होते. त्यामुळे निर्बंध शिथिल होत असताना लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी होत होती. अखेर दुसऱ्या लसीचा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना लोकल प्रवास करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिली. बुधवार, 11 ऑगस्टपासून अशा पात्र प्रवाशांच्या लसीकरणाची पडताळणी रेल्वे स्थानकांवर सुरू होती. गुरुवार, 12 ऑगस्टपासून ऑनलाइन पडताळणी करण्याची व्यवस्था झाल्याने  11 ऑगस्टपासून पात्र प्रवाशांपैकी सुमारे मध्य रेल्वेवर 87,875 तर पश्चिम रेल्वेवर 42,189 अशा एकूण 1 लाख 30 हजार 64 जणांनी रेल्वे पास खरेदी केले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक पास डोंबिवलीत 7,915 तर बोरिवलीत 8,051 हून अधिक पास विक्री झाली आहे.

आजपासून 95 टक्के लोकल फेऱ्या पूर्ववत

कोरोना पूर्व काळात मध्य रेल्वेवर दररोज 1774 तर पश्चिम रेल्वेवर 1367 लोकल फेऱ्या दररोज चालविण्यात येत होत्या. सध्या पश्चिम रेल्वेवर 1201 फेऱ्या तर मध्य रेल्वेवर 1612 फेऱ्या धावत आहेत. आता पुन्हा लसवंत सर्वसामान्यांना लोकल खुली केल्याने पश्चिम रेल्वेने उद्या, 16 ऑगस्टपासून 1300 तर मध्य रेल्वेने 1686 फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आपल्या फेऱ्यांमध्ये उद्यापासून 74 तर पश्चिम रेल्वेने 99 फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही रेल्वेने आपल्या फेऱ्या 95 टक्क्यांपर्यंत पूर्ववत केल्या आहेत.

तारीख            पश्चिम   मध्य

11 ऑगस्ट              11,664   22,689

12 ऑगस्ट              10,430   22,104

13 ऑगस्ट               7,873    17,765

14 ऑगस्ट               7,121    16,439

15 ऑगस्ट दुपारपर्यंत 5,101     8,878

एकूण                42,189 87,875