
मी आयपीएस अधिकारी हनिफ शेख बोलतोय… बेळगावात एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुमचे मानधन दिले जाईल… अशी बतावणी करत अशोक निकाळजे या गायकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक करून त्या पैशांवर गोव्यात मौजमजा करणाऱ्या यलप्पा वैजू कोलकर (32) या भामटय़ाला टिळक नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. बेळगावचा असलेल्या यलप्पाने अशा प्रकारे अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समजते.
ऑक्टोबर महिन्यात अशोक निकाळजे यांना एक फोन आला. समोरच्याने तो कर्नाटकातील आयपीएस अधिकारी हनिफ शेख असल्याची आपली ओळख सांगितली. आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला असून त्यात तुम्ही सहभागी व्हा, तुमचे मानधन देऊ असेही त्याने सांगितले. त्याचबरोबर कर्नाटकातील एक कलावंत प्रवीण गस्ती यालादेखील संपर्क साधून त्यालाही तुमच्या सोबत घेऊन या, त्याचेही मानधन देऊ असे सांगत आयपीएस असल्याची ओळख सांगणाऱ्याने निकाळजे यांना प्रवीण गस्तीचा नंबर दिला. त्यानंतर पाच लाख रुपये एनईएफटी केले असल्याचा संदेश त्या अधिकाऱ्याने निकाळजे यांना पाठवला. दोन दिवसांत पैसे मिळतील असे निकाळजे यांना वाटले. त्याच वेळी निकाळजे यांनी गस्तीला संपर्क साधल्यावर त्याने कार्यक्रमास येण्यास राजी असल्याचे सांगितले. परंतु आधी माझे अर्धे मानधन द्या अशी अट घातली. एनईएफटी केलेले पैसे मिळणार आहेतच या आशेवर निकाळजे यांनी गस्ती याने दिलेल्या दोन बँक खात्यावर आपल्याकडचे पैसे पाठवले. पहिल्या खात्यावर 25 हजार रुपये दोन वेळा फोन पेद्वारे, तर आपल्या बँक खात्यातून दोन लाखाची रोकड गस्तीने दिलेल्या दुसऱ्या बँक खात्यावर पाठवली. पैसे मिळाल्यानंतर आयपीएस असल्याचे सांगणाऱ्या हनिफने निकाळजे यांना टाळण्यास सुरुवात केली.
बँक खात्यांचा अभ्यास केला असता ती खाती गोव्यातील नागरिकांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संदीप पवार व पथकाने गोवा गाठले. तेव्हा ज्या बँक खात्यावर दोन लाख पाठवले होते ते खाते एका टॅक्सी चालकाचे निघाले. माझ्या सहकारी टॅक्सी चालकाने त्याच्या एका प्रवाशाच्या बँक खात्याची अडचण झाल्याने आमच्या खात्यावर पैसे मागवून घेतल्याचे चालकाकडून समजले. ती व्यक्ती कलाकार असून इव्हेंटवाल्यांना पैसे पाठवायचे असल्याने आमची बँक खाती दिल्याचे ते म्हणाले. पण तो अचाकन बेपत्ता झाला. ना आमचे भाडे दिले ना ज्या हॉटेलात थांबलेला तिकडचे बिल भरले, असेही टॅक्सी चालकांनी सांगितले. मग पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे यलप्पा या भामटय़ाला एका हॉटेलात पकडले. आयपीएस अधिकारी, प्रवीण गस्ती आणि यलप्पा कोलकर या तिन्ही नावांचा एकच व्यक्ती असल्याचे आरोपीच्या अटकेनंतर स्पष्ट झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल व दोन सीम कार्ड जप्त करण्यात आले.
मग फसवणूक झाल्याचे समजले
ही बाब निकाळजे यांनी त्यांच्या एका सहकारी महिलेला सांगितली. असे कुठलेही कार्यक्रम होत नसतात, तुझी फसवणूक झाल्याचे महिला कलावंताने सांगितल्यानंतर अशोक निकाळजे यांनी टिळक नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार तसेच राहुल बनसोडे, नामदेव करांडे या पथकाने तपास सुरू केला.
























































